पावसाळ्यात भटकंतीची वाट मढे घाट
वेल्हा हा पुणे जिल्ह्यातला पुणे शहराला लागूनच असलेला, तरीही स्वतःचं वेगळेपण राखून असलेला, निसर्गाच्या दृष्टीनं अतिशय समृद्ध तालुका. वेल्ह्यापासून १८ किलोमीटरवर असलेला मढे घाट हा डोंगराळ भाग अतिशय निसर्गसंपन्न आहे.
वेल्ह्यापासून १८ किलोमीटरवर असलेला मढे घाट हा डोंगराळ भाग निसर्गानं अतिशय समृद्ध आहे. नरवीर तानाजीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह याच घाटातून त्याच्या गावाला नेण्यात आला होता, तेव्हापासून या घाटाला मढे घाट नाव पडलं, असं सांगितलं जातं.
मढे घाटात पुण्यातून जायचं असेल, तर दोन रस्ते आहेत. पहिला म्हणजे पुणे-बेंगळुरू महामार्गावरून खेड शिवापूर-नसरापूरमार्गे वेल्हा आणि दुसरा सिंहगडाच्या बाजूने जाणारा पाबे घाटातील रस्ता. डोणजे फाट्याकडून पानशेत रस्त्याला लागल्यानंतर आधी खानापूर हे एक छोटं गाव लागतं. तिथून लगेचच पाबे घाटाकडे जाणारा रस्ता आहे. या घाटमार्गे वेल्ह्यात पोहोचून वेल्ह्यातून मढे घाटात जाता येतं. डोणजे फाट्यापासूनचा पुढचा सगळाच रस्ता पावसाळ्यात अतिशय फुललेला असतो. एका बाजूला पानशेतच्या धरणात अडवलेला जलाशय आपली अखंड साथ करत असतो. हिरव्या वनराईतला रस्ताही प्रवासाचा आनंद देत असतो. खानापूर सोडून डावीकडे वळलं, की लगेचच पाबे घाटरस्ता सुरू होतो. हा घाट फारसा अवघड नाही आणि निवांतही आहे. अर्थात, रस्ता मध्येमध्ये खराब आहे आणि अरुंदही आहे; पण जास्त रहदारी नसल्यामुळे प्रवासाचा आनंद घेता येतो. शिवाय जोडीला भरभरून निसर्गाचं वरदानही आहे.
वेल्ह्याच्या स्टँडजवळूनच मढे घाटाकडे जाणारा रस्ता आहे. एकदा गाव मागे टाकलं, की पुन्हा निवांत आणि हिरवाईनं नटलेला रस्ता सुरू होतो. वाटेतले डोंगर, झाडं, धबधबे आपल्याला खुणावत राहतात. काही धबधबे थेट रस्त्याच्या कडेला आहेत, तर काही आत लपून बसलेले. त्यांचा रस्त्यापर्यंत येणारा आवाज मात्र जाणवत राहतो. मध्येच एखादा चुकार झरा रस्त्यापर्यंत येऊन रस्त्याच्या कडेने आपला दरीत कोसळण्याचा मार्ग शोधतो. एखादा ओहोळ खळखळत निसर्गाच्या संगीतात आपली भर घालत राहतो. मढे घाटाच्या मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यासाठी केळद या गावापासून आत रस्ता आहे. वाटेत बऱ्यापैकी मार्गफलक आहेत आणि जास्त फाटेही नाहीत. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता कमी राहते. शेतातल्या भातपिकांचा हिरवा वास अनुभवत, स्वच्छ शुद्ध हवा उरात भरून घेत, मोरांच्या केकारवाचा आस्वाद घेत आपण केळदपर्यंत येऊन पोहोचतो. तिथून आत जाण्यासाठी थोडा कच्चा रस्ता आहे. ज्या पठारावरून धबधबा खोल दरीत कोसळतो, तिथपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता असला, तरी गाडी घेऊन तिथपर्यंत जाणं फारसं सुरक्षित नाही. मध्ये मोठा चढ आहे आणि तिथला रस्ताही पावसामुळे उखडलेला आहे. पूल ओलांडल्यावर खालच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गाडी लावून धबधब्याच्या रस्त्याने चालत जाणं सर्वांत चांगलं.
या पठारावरूनच वाहणारे सगळे ओहोळ एकत्र येऊन मोठी नदी तयार होते आणि तीच खाली धबधबा म्हणून कोसळते. आपण धबधब्याच्या वरच्या बाजूला पोहोचतो. डोंगराच्या कड्यावरून खाली दिसणारी दरी, समृद्ध जंगल, मधूनच डोंगरातून कोसळणारे छोटेमोठे धबधबे, हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासारखं असतं. नदीचं पाणी उथळ आहे आणि अनेक ठिकाणी बसून पाण्यात खेळता येण्यासारखं आहे. अर्थात, कड्याच्या बाजूला न जाण्याची खबरदारी घ्यायला हवी. कड्याच्या दुसऱ्या बाजूने गेल्यावर खोल दरीत कोसळणारा हा धबधबा दिसतो आणि डोळ्यांचं पारणं फेडतो. उंचावर असल्यामुळे पावसाळ्यात या भागात दाट धुकं असतं, त्यामुळे चालतानाही काळजी घ्यावी लागते. धुकं विरळ झाल्यावर तीन बाजूंचा डोंगर, त्यातून कोसळणारा धबधबा हे सह्याद्रीचं रौद्र सौंदर्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं.
धबधब्याच्या खालच्या बाजूला दरीत उतरून जाण्यासाठीही इथून एक छोटी पायवाट आहे; मात्र पावसाळ्यात तिथून जाताना जरा जास्त काळजी घ्यावी लागते. शिवाय कुटुंबाबरोबर जाताना तिकडे न फिरकलेलंच बरं. निसर्गाची काळजी घेऊन, त्याला आंजारत गोंजारत, त्याचा मान राखत त्याचा आस्वाद आपण घेतला, तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो, याचा अनुभव मढे घाटात नक्कीच घेता येतो.
कसं जायचं?
- पुण्याहून वेल्हा गाव नसरापूरमार्गे ६० किलोमीटर आहे. वेल्ह्यातून मढे घाट १८ किलोमीटर. वेल्ह्यापर्यंत एसटी बसची सेवा आहे, पुढे केळदपर्यंत वेगळी एसटी मिळू शकते.
- पानशेत रस्त्याने पाबे घाट-वेल्हा या मार्गेही मढे घाटात जाता येते. या मार्गाने अंतर ६५ किलोमीटर.
अभिजित पेंढारकर यांच्या लेखातून
मढे घाटातील धबधब्याची गुगल पिन
https://goo.gl/maps/3nHvYPbzDy32
मढे घाटातील धबधब्याचा यु ट्युब व्हिडिओ
https://youtu.be/6OV8tZe8uQg
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975
No comments:
Post a Comment